नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या फटक्यानंतर गृहिणींचे बजेटही अडचणीत आले आहे. कारण, देशातील बहुतांश शहरांमधील बाजारपेठांत टोमॅटोची किंमत प्रति किलो 72 रुपयापर्यंत पोहोचली आहे. टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला अवकाळी पाऊस पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये येणारी टोमॅटोची आवक कमी झाली आहे.
कोलकात्यात 12 ऑक्टोबरला टोमॅटोचा दर 12 ऑक्टोबरला प्रति किलो 72 रुपये होता. तर महिनाभरापूर्वी टोमॅटोचा दर हा 38 रुपये प्रति किलो होता. दिल्ली आणि चेन्नईमधील किरकोळ बाजारपेठेत टोमॅटोचा दर प्रति किलो 20 ते 30 रुपयांनी वाढून 57 रुपये आहे. ही माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. गेल्या महिन्यात 13 सप्टेंबरला मुंबईत टोमॅटोचा दर प्रति किलो 15 रुपये होता. सध्या, मुंबईमधील किरकोळ बाजारपेठेत टोमॅटोचा दर हा प्रति किलो 53 रुपये आहे.
हेही वाचा-राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राचा हिरवा कंदील; २०२२ मध्ये सुरू करणार वाहतूक
आशिया खंडामधील सर्वात मोठ्या बाजारपेठेमध्येही टोमॅटो महाग
आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक म्हणाले, की टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात घेण्यात येते. या राज्यांत अवकाळी पाऊस झाल्याने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे घाऊक व किरकोळ अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये टोमॅटोच्या किमती वाढल्या आहेत. आझादपूर मंडी ही पालेभाज्या व फळांची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
हेही वाचा-आरबीआयने पुणे जनता सहकारी बँकेला ठोठावला 30 लाखांचा दंड
मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये टोमॅटो पिकाची लागवड सुरू आहे. या पिकांपासून 2 ते 3 महिन्यांनी टोमॅटो बाजारपेठेसाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, भारत हा चीननंतर टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश आहे.
महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांचे झाले होते नुकसान-
महिनाभरापूर्वी टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोची वाहतूकदेखील परवडली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो भररस्त्यात फेकून दिले होते. तर अनेक शेतकऱ्यांनी शेतामधील टोमॅटोचे पिक काढून टाकले होते.
हेही वाचा-खाद्यतेल्याच्या साठेबाजीवर केंद्र सरकारकडून निर्बंध; सणासुदीत तेलाचे भाव होतील कमी?