मुंबई - शेअर बाजाराने आज पुन्हा विक्रमी निर्देशांकावर पोहोचला आहे. शेअर बाजार निर्देशांक २०० अंशाने वधारून ४०,६७६ वर पोहोचला. एचडीएफसी, आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारल्याने शेअर बाजार तेजी दिसून आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्थावर मालमत्ता क्षेत्रांसाठी आर्थिक सुधारणांची घोषणा केल्याने बाजारात उत्साह निर्माण झाला.
केंद्र सरकारने सुमारे १ हजार ६०० हून अधिक रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी २५ हजार कोटींचा निधी जमा करण्याचा निर्णय बुधवारी मंजूर केला आहे. या निर्णयाने स्थावर मालमत्ता क्षेत्राला चालना मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचा उद्योग क्षेत्रावरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-महाराष्ट्रासह कर्नाटकातून येणारी आवक घटली; दिल्लीत कांद्याने गाठली शंभरी!
कॉर्पोरेट कंपन्यांनी नोंदविलेला मोठा नफा आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा भांडवली बाजारामध्ये येणारा निधी या कारणांनी शेअर बाजारात सकारात्मक चित्र आहे. निफ्टीचा निर्देशांक ५०.२० अंशाने वधारून १२,०१६.२५ वर पोहोचला.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
इंडसइंड बँक, एसबीआय, आयटीसी, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर हे ३ टक्क्यांनी वधारले.
टाटा स्टील, वेदांत, ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, येस बँक आणि बजाज ऑटोचे शेअर हे २ टक्क्यापर्यंत घसरले. शेअर बाजार निर्देशांक २२१.५५ अंशाने वधारून ४०,४६९.७८ वर स्थिरावला होता.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून बुधवारी १ हजार ११.४९ कोटींच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदारांनी १ हजार ११७.२५ कोटींच्या शेअरची विक्री केली.