मुंबई - शेअर बाजारात सलग सहाव्या सत्रात आज १,१०० हजार अंशांनी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी सुमारे ५ लाख कोटी रुपये गमाविले आहेत. कोरोना विषाणुचे चीननंतर जगभरात थैमान सुरू झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासदरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या भीतीने शेअर बाजाराला फटका बसला आहे.
मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात निर्देशांक १,१००.२७ अंशांनी घसरून ३८,६४५.३९ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ३२९.५० अंशांनी घसरून ११,३०३.८० वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
शेअर बाजाराची सर्वच क्षेत्रात घसरण झाली आहे. टाटा स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, एचसीएल टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत.
मागील सत्रात शेअर बाजार १४३.३० अंशांनी घसरून ३९,७४५ वर स्थिरावला होता. तर निफ्टीतही ४५.२० अंशांनी घसरण होवून निर्देशांक ११,६३३.३० वर स्थिरावला होता.
हेही वाचा-
ही आहेत शेअर बाजार घसरणीचे कारणे-
- बाजार विश्वेषकांच्या मते, गेल्या आठवड्यात कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कमीत कमी परिणाम होईल, अशी बाजाराला अपेक्षा होती. कारण कोरोना चीनपुरता मर्यादित होता. मात्र, त्यानंतर इटलीसारख्या चीनबाहेरील देशातही कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणखी मंदावण्याची भीती आहे.
- विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून निधी काढून घेण्याचे प्रमाण वाढविले आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून ३,१२७.३६ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.
- शेअर बाजार गुंतवणूकदार पंकज जैस्वाल म्हणाले, चीनमधील उद्योगांवर देशातील अनेक उद्योग निगडीत आहे. कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संस्थेने धोक्याचा इशारा दिला आहे. युरोपमध्ये कोरोनाचा परिणाम जाणवत आहे. या जागतिक वातावरणाचा शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांनी मागील तिमाहीत जीडीपी स्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवरून वाटणाऱ्या चिंतेमुळेही शेअर बाजारावर परिणाम जाणवत आहे.
- दिल्लीमध्ये काही घटना घडल्या आहेत. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत शेअर बाजाराला खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यामधून काही अपेक्षित निष्पन्न झालेली नाही.
येत्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजार सुधारेल अशी अपेक्षा आहे. कारण, भारताला कोरोनाचा तेवढा धोका नाही, असे मत जैस्वाल यांनी व्यक्त केले.
हेही वाचा-व्होडाफोन आयडियाने सरकारकडे केली 'ही' चक्रावून टाकणारी मागणी
जागतिक शेअर बाजारातही घसरण सुरुच
शांघाय, हाँगकाँग, सेऊल, टोकिया येथील शेअर बाजारात सकाळच्या सत्रात ४ टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे. वॉलस्ट्रीटच्या शेअर बाजारात आठवडाभरात ३,२२५.७७ अंशांनी घसरण झाली आहे.
खनिज तेलाचे घसरले दर-
चीनमधील कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाने जागतिक बाजारातील खनिज तेलाची मागणी कमी होणार आहे. या शक्यतेने खनिज तेलाच्या किमती ४ टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाल्या आहेत.
हेही वाचा-कोरोनाची धास्ती: चिकन ७० टक्क्यांनी स्वस्त, ५० टक्क्यांनी घटली विक्री
रुपयाची घसरण सुरुच-
सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत २८ पैशांनी घसरून रुपयाचे मूल्य ७१.८९ झाले आहे.