मुंबई - शेअर बाजार निर्देशांक आणि निफ्टीत अंशत: घसरण झाली. आयटी कंपन्या आणि बँकांच्या शेअरमध्ये घसरण झाली. व्होडाफोनचे शेअर 23 टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरले.
शेअर बाजार बंद होताना निर्देशांक 38.44 अंशाने घसरून 39,020.39 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक हा 21.50 अंशाने घसरून 11,582 वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
येस बँक, एसबीआय आणि इंडसइंड बँकेचे शेअर 5.76 टक्क्यापर्यंत घसरले. भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, टाटा स्टील आणि टाटा मोटर्सचे शेअर 3.31 टक्क्यांनी वधारले.
इन्फोसिसची सेबीकडून चौकशी
सेबी आणि अमेरिकेच्या सेक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशनने इन्फोसिसची चौकशी सुरू केली आहे. त्याचा परिणाम म्हणून इन्फोसिसचे शेअर 2.26 टक्क्यांनी घसरले. इन्फोसिसमधील काही जागल्यांनी (व्हिसलब्लोअर) कंपनीमध्ये अनुचित प्रकार झाल्याची संचालक मंडळाकडे तक्रार केली होती. यानंतर इन्फोसिसच्या खात्यामधील अनियमिततेची तपासणी करण्याबाबत केंद्र सरकारने नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथोरिटीला (एनएफआरए) विचारणा केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोनचे शेअर 23 टक्क्यांनी घसरले-
विविध दूरसंचार कंपन्यांनी केंद्र सरकारचे सुमारे 92 हजार कोटी रुपये थकविले आहेत. हे पैसे वसूल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला परवानगी दिली आहे. त्यानंतर व्होडाफोनचे शेअर 3 टक्क्यांनी घसरले. भारती एअरटेलही शेअर 9.68 टक्क्यापर्यंत घसरले होते. मात्र, हे शेअर सावरून पुन्हा 3.31 टक्क्यांनी वधारले.