मुंबई - अमेरिका-चीनमध्ये पहिल्या टप्प्यातील व्यापार करार अस्तित्वात आला आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारासह निफ्टीने आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांकावर झेप घेतली. शेअर बाजाराने ४२,००० निर्देशांकाचा टप्पा गाठला. तर निफ्टी बाजार खुला होताना १२,३७७.८० या विक्रमी निर्देशांकावर पोहोचला.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक १२७.६५ अंशाने वधारून ४२,००९.९४ वर पोहोचला आहे. त्यापूर्वी मुंबई शेअर बाजाराने ४२,००९.९४ या विक्रमी निर्देशांकाची नोंद केली. तर निफ्टी २८.४५ अंशाने वधारून १२,३७१.७५ वर पोहोचला.
हेही वाचा-स्टेट बँकेचा ठेवीदारांना धक्का; 'या' मुदतठेवीच्या व्याजदरात होणार कपात
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
सन फार्माचे शेअर सर्वाधिक १.३० टक्क्यांनी वधारले आहेत. नेस्ले इंडिया, एचयूएल, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो आणि भारती एअरटेलचे वधारले आहेत.
इंडुसइंड बँक, टाटा स्टील, एनटीपीसी, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, ओएनजीसी आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-विप्रोच्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीदरम्यान २.१७ टक्क्यांची घसरण
अशी आहे जागतिक आर्थिक स्थिती-
- अमेरिका-चीनमधील व्यापारी करार अस्तित्वात आल्याने जगभरातील गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
- व्यापारी करारामध्ये बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण, अमेरिकेतील वित्तीय संस्थांवरील निर्बंध हटविणे, चलनामधील नियमभंग करणे टाळणे अशा मुद्द्यांचा समावेश आहे.
- जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ०.६१ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६४.३९ डॉलरवर पोहोचले आहेत.
- रुपया डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी वधारून सकाळच्या सत्रात ७०.७७ वर पोहोचला आहे.