मुंबई : देशातील सतत वाढत्या कोरोना केसेसमुळे गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच सोमवारी शेअर बाजाराची लाल निशाणाने सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 1,729.62 अंक (3.49 टक्के) खाली घसरून 47,861.70 या नीचांकावर खुला झाला. त्याच वेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 522.05 अंकांनी (3.52 टक्क्यांनी) घसरून 14,312.80 वर उघडला.
दरम्यान, आज 386 शेअर्सची परफॉर्मन्स चांगली झाली, 1181 शेअर्सची घसरण झाली, तर 76 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
भारतीय शेअर बाजाराला कोरोनाचा फटका बसला आहे. आज सकाळी बीएसईचा सेन्सेक्स 1700 अंकांनी खाली घसरून 47,861.70 वर आला. यामुळे मार्केट कॅपमध्ये 7 लाख कोटी रुपयांची मोठी कपात झाली आहे. 15 मिनिटातच बाजाराने वातावरण पूर्णपणे खराब केले.
मागील वर्षी कोरोनामुळे 23 मार्चपासून बाजारात घट झाली होती. मधल्या काळात सेन्सेक्स अगदी ५२ हजार अंकांपर्यंत वर गेला होता. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून तो घसरत आहे. आजच्या घसरणीत सगळ्यात जास्त फटका बँकिंग क्षेत्राला बसला. खासगी बँकांच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांनी घट झाली आहे, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांमध्ये 10% घट झाली आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लॉकडाऊबाबत करणार चर्चा