मुंबई - रुपया डॉलरच्या तुलनेत ७९ पैशांनी वधारून ६९.४४ वर पोहोचला आहे. बहुतांश मतदान निकालाच्या अंदाजात एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून रुपया डॉलरच्या तुलनेत वधारला आहे.
फॉरेक्स ट्रेडर्स म्हणाले, एक्झिट पोलच्या निकालाचे गुंतवणुकदारांनी स्वागत केले आहे. शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ७०.२३ रुपयावर पोहोचला होता. गुरुवारी विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी १ हजार ५७.८२ कोटी रुपये भांडवली बाजारातून काढले आहेत. कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलचा दर १,४८ टक्क्याने वाढून हा ७३.२८ डॉलरवर पोहोचला आहे.
मे महिन्यात भांडवली बाजाराला बसलाय फटका-
निवडणुकीनंतर येणारी अस्थिरता आणि अमेरिका-चीनच्या व्यापारी युद्धाचा भारतीय शेअर बाजाराला फटका बसला आहे. विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी मे महिन्यात भांडवली बाजारातून ६ हजार ३९९ कोटी रुपये काढून घेतले आहेत.
शेअर बाजारात मॉनिटरिंग व्यवस्था -
एक्झिट पोल घोषित होताच शेअर बाजाराचे पहिले सत्र सोमवारी सुरू होण्यापूर्वी मॉनिटरिंग व्यवस्था सुरू होणार आहे. ही यंत्रणा निवडणूक निकाल लागण्यादिवशी म्हणजे गुरुवारीही सुरू राहणार आहे. निवडणुकीच्या निकालाचे शेअर बाजारावर मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून अस्थिर अशा शेअर बाजारातील नियमबाह्य हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.