नवी दिल्ली - शेअर बाजार संस्था नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये पहिल्यांदाच शेत मालासाठी भविष्यकालीन सौदे (फ्युचर कॉन्ट्रॅक्ट) उपलब्ध करून देणार आहेत. यामध्ये देशातील सोयाबीन तेल प्रक्रिया उद्योग आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना किमतीचे व्यवस्थापन करता येणार असल्याचे एनएसईने म्हटले आहे.
भविष्यकालीन सौद्यासाठी गुजरातमधील कांडला जहाज बंदरावर असलेल्या १० मेट्रिक शेत मालाची किंमत ही आधारभूत किंमत धरण्यात येणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये म्हणाले, की भारतीय मालाच्या बाजारपेठेकरता प्रभावी सुविधा शेअर बाजारातून देण्यात येणार आहेत. सॉलव्हंट एक्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता म्हणाले, की भविष्यकालीन सौदे हे जोखीम व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच उद्योगासाठी हे भविष्यकालीन सौदे उपयुक्त आहेत. सक्षम अर्थव्यवस्था होण्यासाठी असे भविष्यकालीन सौदे लाँच करावेत, अशी अपेक्षा मेहता यांनी व्यक्त केली.
शेअर बाजारात आज तेजी-
शेअर बाजाराने आजपर्यंतचा विक्रम नोंदवून ४२,६४५.३३ चा टप्पा गाठला होता. दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७०४.३७ अंशाने वधारून ४२,५९७.४३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १९७.५० अंशाने वधारून १२,४६१.०५ वर स्थिरावला.