मुंबई - सलग पाचव्या सत्रात निफ्टीचा निर्देशांक वधारला आहे. निफ्टीने दिवसाखेर विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे. डेरिटिव्हजची मुदत संपत असताना आणि जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती असतानाही निफ्टीत तेजी दिसून आली आहे.
देशात नवीन कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असताना आणि रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वधारताना गुंतवणुकदारांचा विश्वास वाढल्याचे ट्रेडर्सने सांगितले. निफ्टीचा शेअर बाजार अस्थिर राहिल्यानंतर दिवसाखेर निर्देशांक ३६.४० अंशाने वधारून १५,३३७.८५ वर स्थिरावला. मागील सत्रात निफ्टीचा निर्देशांक १५,३१४.७० वर स्थिरावला होता.
हेही वाचा-पोलिसांकडून धमकाविण्याकरता वापरण्यात येणारी रणनीती चिंताजनक - ट्विटर
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ९७.७० अंशाने वधारून ५१,११५.२२ वर स्थिरावला. बँकिंग, आयटी आणि उर्जा कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
मुंबई शेअर बाजारात स्टेट बँकेचे सर्वाधिक २.८४ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ कोटक बँक, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया आणि पॉवरग्रीडचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे एचडीएफसी, बजाज फायनान्स, ओएनजीसी, भारती एअरटेल, एचयूएल आणि मारुतीचे शेअर २.३८ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
हेही वाचा-चलनी नोटा छापण्याची वेळ आली - उदय कोटक यांचा केंद्राला सल्ला
कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याने गुंतवणूकदार आशादायी-
जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख विनोद नायर म्हणाले, की कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असताना राज्यांमध्ये लॉकडाऊन निघण्याची आशा गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे शेअर बाजार खुला होताना निर्देशांक वधारला.