मुंबई - जागतिक पातळीवर वेगाने घडणाऱ्या घडामोडीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सकाळच्या सत्रात सावध पवित्रा घेतला. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध मिटण्याची अनिश्चितता आणि हाँगकाँगमधील राजकीय वाद या दोन्ही कारणांनी आशियातील शेअर बाजार गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक १०० अंशाने घसरून ४०,३१९.०४ वर पोहोचला.
शेअर बाजार १०० अंशाने घसरल्यानंतर काही कंपन्यांच्या शेअरला ४.५७ टक्क्यापर्यंत फटका बसला. तर निफ्टीचा निर्देशांक ७.७५ अंशाने घसरून ११,९००.४० वर पोहोचला.
हेही वाचा-रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची होणार नियुक्ती? 'ही' आहेत चर्चेतील नावे
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
सन फार्मा, एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, वेदांत आणि एशियन पेंट्सचे शेअर हे १.४३ टक्क्यापर्यंत घसरले. तर येस बँक, एम अँड एम, टाटा मोटर्स, एनटीपीसी, टाटा स्टील आणि कोटक बँकेचे शेअर हे २.६१ टक्क्यांनी वाढले.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी ९३२.२० कोटींच्या शेअरची भांडवली बाजारामधून खरेदी केली होती. तर देशामधील गुंतवणूकदार संस्थांनी ५८४.४८ कोटींच्या शेअरची शुक्रवारी विक्री केली आहे.
हेही वाचा-'केंद्र सरकार किमती नियंत्रणात ठेवण्याकरता १ लाख टन कांदा आयात करणार'
जागतिक पातळीवर अशी आहे स्थिती-
हाँगकाँगमधील निदर्शनाचा फटका शांघाय, हाँगकाँग, टोकियो आणि सेऊलमधील शेअर बाजाराला फटका बसला आहे. तेथील शेअर बाजारात २.१० टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदविण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेले अतिरिक्त आयात शुल्क मागे घेणअयासाठी संमती दर्शविली नाही. त्यामुळे अमेरिका-चीनच्या व्यापारी युद्ध मिटणार की नाही, अशी जगभरात सांशकता निर्माण झाली आहे.
मागील सत्रात शेअर बाजार निर्देशांक ३३०.१३ अंशाने घसरून ४०,३२३.६१ अंशावर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १०३.९० अंशाने घसरून ११,९०८.१५ वर स्थिरावला होता.