मुंबई- भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच शेअर मार्केट हे 50, 000 हून अधिक झाल्याचे दिसून आले आहे. शेअर बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या शंभर वर्षांमध्ये नसेल असा अर्थसंकल्प आम्ही यावेळेस सादर करू, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटले होते. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळे शेअर बाजारांमध्ये उच्चांक पाहायला मिळालेला आहे.
शेअर मार्केट व अर्थतज्ज्ञ पंकज जैस्वाल यांनी शेअर बाजारातील तेजीची विविध कारणे सांगितली आहेत. अमेरिकेमध्ये जो बायडन व कमला हॅरीस यांचा शपथविधी झाल्यानंतर याचा संपूर्ण प्रभाव हा जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. डोनॉल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये मुस्लिम देशांवरही बंधन घालण्यात आलेली होती. ही बंधन तात्काळ उठवण्यात आल्यामुळे याचा प्रभावही शेअर बाजारावर पाहायला मिळालेला आहे. पंकज जैस्वाल म्हणाले की, शेअर बाजार पहिल्यांदाच ५०,०००हून अधिक झाला आहे. बिडेन यांनी केलेल्या आर्थिक पॅकेजच्या घोषणा व अमेरिकेत झालेला सत्तापालट याचे गुंतवणुकदारांनी स्वागत केले आहे. कोरोना लसीकरणामुळे जागतिक बाजारात सकारात्मक चित्र आहे.
हेही वाचा-टेस्ला गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठा प्रकल्प सुरू करेल-गुजरातचे उपमुख्यमंत्री
कोरोना संसर्गावर भारताची योग्य उपाययोजना
कोरोना संक्रमणाचा काळ पाहता भारतामध्ये दोन लशी बाजारात आल्या आहेत. या लसींचे लसीकरणसुद्धा सुरू करण्यात आले आहे. शेअर बाजारावर त्याचा प्रभाव दिसून आलेला आहे. जगभरात भारताच्याबाबतीत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. सेन्सेक्स गुरुवारी 49 हजार 624 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 14 हजार 590 अंकांवर बंद झालेला आहे. 2021 च्या आगामी आर्थिक बजेटच्या अगोदरच बाजारामध्ये उसळी पाहायला मिळाल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये बाजार आणखीन सुधारेल, असेही शेअर बाजार तज्ज्ञांनी म्हटले आहे.
हेही वाचा-वर्कफ्रॉम होम ट्रेंडचा बांधकाम क्षेत्राला 'असा'ही फायदा