नवी दिल्ली - दोन दिवसांत शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. या पडझडीमुळे शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ७ लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. कोरोनाबाधितांचे देशात प्रमाण वाढल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ७४०.१९ अंशाने घसरून ४८,४४०.१२ वर स्थिरावला. तर दोन दिवसांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,६११.३२ अंशाने घसरला आहे. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ७,००,५९१.४७ कोटी रुपयांवरून १,९८,७५,४७०.४३ कोटी रुपये झाले आहे.
रिलीगेअर ब्रोकिंग लिं. कंपनीचे (संशोधन) उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती आहे. कोरोनाबाधितांची संख्या देशात वाढत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये शेअर विक्रीचा दबाव दिसून आला आहे. बीएसईमधील क्षेत्रनिहाय निर्देशांकात दूरसंचार, उर्जा, ऑटो आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर ३.१४ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
हेही वाचा-रिअलमीचा 8 श्रेणीत स्मार्टफोन लाँच; 108 मेगापिक्सेल आहे कॅमेरा
या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले-
मुंबई शेअर बाजारात मारुतीचे शेअर सर्वाधिक ३.९८ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ एचयूएल, भारती एअरटेल, बजाज ऑटो, एनटीपीसी, बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर घसरले आहेत. शेअर बाजारात केवळ डॉ. रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि एल अँड टीचे शेअर ०.७४ टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या २,२४७ कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. तर ७०६ कंपन्यांचे शेअर वधारले तर १६८ कंपन्यांचे स्थिर राहिले आहेत.
हेही वाचा-व्हॉट्सअपला धक्का! गोपनीयतेच्या धोरणाचा सीसीआय करणार सखोल तपास
जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने शेअर बाजार अस्थिर राहिला आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.