नवी दिल्ली - सोन्याच्या दराने आज भाववाढीचा विक्रम केला आहे. सोन्याचा प्रतितोळा ३५ हजार ९७० रुपये दर झाला आहे. स्थानिक सोनारांकडून सातत्याने खरेदी होत असल्याने ही भाववाढ झाल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने म्हटले आहे.
चांदीचा दर २६० रुपयाने वाढून प्रतिकिलो ४१ हजार ९६० रुपये झाला आहे. औद्योगिक घटक तसेच नाणे निर्मिती करणाऱ्यांकडून मागणी वाढल्याने चांदीचे दर वाढले आहेत. आज सोने प्रतितोळा ३५ हजार ९७० रुपये दराने विकण्यात आले. हा आजपर्यंत सर्वात अधिक भाव होता, असे ऑल इंडिया सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी सांगितले. स्थानिक सोनारांकडून मागणी वाढल्याने सोन्याच्या किमती वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेअर बाजारात घसरण सुरू असल्यानेही सोन्याचे दर वाढण्याला मदत झाली आहे. कारण गुंतवणूक करण्यासाठी सोन्यामधील गुंतणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते.
असे आहेत नवी दिल्लीमधील सोन्याचे दर -
राजधानीत ९९.९ टक्के शुद्ध असलेल्या सोन्याचा दर १०० रुपयांनी वाढून ३५, ९७० रुपये झाला. तर ९९.५ टक्के शुद्ध असलेल्या सोन्याचा दर ३५,८०० रुपये झाला आहे. शनिवारी सोन्याचे दर प्रति तोळा ८० रुपयाने घसरून ३५,८७० रुपये झाला आहे.