नवी दिल्ली - सोन्याच्या किमती दिल्लीत प्रति तोळा १०३ रुपयांनी वाढून ५१ हजार २८६ रुपये आहेत. रुपयाची घसरण आणि जागतिक बाजारातील स्थितीमुळे सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ५१ हजार १८३ रुपये होता चांदीचा दर आज प्रति किलो ७९३ रुपयांनी वाढून ६२ हजार १५५ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६१ हजार ३६२ रुपये होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले, की जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. तर देशात रुपयाची डॉलरच्या तुलनेत ३२ पैशांनी घसरण झाली आहे. त्यामुळे २४ कॅरट सोन्याचा दर दिल्लीत प्रति तोळा १०३ रुपयांनी वाढला आहे.
या कारणाने सोन्याचे वाढले दर
अमेरिकेत डॉलरचे मूल्य वाढले असले तरी अध्यपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अस्थिरता आहे. युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने टाळेबंदीसारख्या उपाययोजनांची भीती आहे. अशा परिस्थितीत सोन्याचे दर वाढल्याचे पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, सोन्यामधील गुंतवणूकदार सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अस्थिरता असताना गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवितात.