नवी दिल्ली - सोने खरेदी करण्याचा विचारात असाल तर तुम्हाला थोडे थांबावे लागण्याची शक्यता आहे. लग्नसराई संपली असली तर सोन्याच्या दराने आज गेल्या ६ वर्षातील उच्चांक गाठला आहे. सोन्याचा प्रति तोळा भाव आज ३४ हजार ५०० रुपये आहे.
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कपात केली आहे. त्यानंतर सुरक्षित अशी गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने जगभरातील गुंतवणूकदार सोन्याची खरेदी करत आहेत. सोन्याचे दर हे जागतिक बाजारपेठेत सातत्याने वाढत आहेत.
कॉमेक्समध्ये सोन्याच्या भावाने गेल्या सहा वर्षातील उच्चांक गाठला. कॉमेक्स ही कमोडिटी एक्सचेंजशी संलग्न असलेल्या न्यूयॉर्क मर्चेटांईल एक्सचेंजची बाजारपेठ आहे.
सोन्याचा २८ ऑगस्ट २०१३ ला प्रति तोळा भाव ३५ हजार ७४ रुपये होता. विदेशातील बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढल्यानंतर ही दरवाढ झाली होती.