नवी दिल्ली - सोन्याच्या किमती दिल्लीत प्रति तोळा ६५ रुपयांनी वाढून ४८,५५१ रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्याने देशात सोन्याचे दर किंचित वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
चांदीच्या किमती प्रति किलो २९८ रुपयांनी वाढून ६१,२३२ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर ६०,९३२ रुपये प्रति किलो होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ६५ रुपयांनी वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य हे १० पैशांनी वाढले आहे.
रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक श्रीराम अय्यर म्हणाले, की डॉलर बळकट होत असताना सोन्याच्या दरात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत कोरोना महामारीच्या संकटात आर्थिक पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सोने खरेदी करण्याची चांगली संधी असल्याचे वाटते.
सोने आयातीत घट-
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये लक्षणीय घट नोंदली गेली. यावेळी ९.२८ अब्ज डॉलर्स किंमतीची सोन्याची आयात करण्यात आली. मागील आर्थिक वर्षाच्या तत्सम कालावधीपेक्षा हे ४७.४२ टक्क्यांनी कमी आहे.