मुंबई - धनत्रयोदशीला दिवाळीनिमित्त सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे बाजारपेठेत उत्साह असल्याचे चित्र आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत 70 ते 75 टक्के सोने खरेदी होणार असल्याचे सराफ व्यवसायिकांचा अंदाज आहे.
कोरोना आणि टाळेबंदीमुळे लोकांच्या क्रयक्षमेतवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कोरोनावर लस उपलब्ध होईल, या आशेने बाजारपेठेत उत्साह आहे. अर्थव्यवस्था अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जात असल्याने गुंतवणूकदारांचे आकर्षण सोन्यापासून इतर गुंतवणूकीकडे जात आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे.
असे आहेत प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर-
सोन्याचा भाव प्रति तोळा 70 रुपयांनी घसरून 50,650 रुपयांवर आला आहे. त्याचवेळी 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 49,650 रुपयांवर पोहोचली. चेन्नईत सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 51970 रुपये राहिले आहेत. तर मुंबईत सोन्याला प्रति तोळा (10 ग्रॅम) 50,650 रुपये, तर दिल्लीत सोने प्रति तोळा 53, 650 रुपये, कोलकातामध्ये 52,530 रुपये आहे. केरळमध्ये प्रति तोळा 51, 490 रुपये, लखनौमध्ये 53610 रुपये प्रति तोळा आहे.
काय आहे सराफ व्यावसायिकांचा अंदाज?
सराफ व्यवसायिक वृशांक जैन म्हणाले, की गतवर्षीच्या तुलनेत यंदा 70 ते 75 टक्केच सोने खरेदी होणार आहे. लोक बाजारात येत आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाण आहे. तरीही सध्याच्या स्थिती पाहता चांगली स्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानात केवळ चार ते पाच ग्राहकांना परवानगी देण्यात येणार आहे. प्रकाश भन्साळी म्हणाले, लोक बाजारात येत असल्याने व्यापारी खुश आहेत.
...म्हणून सोने खरेदीकडे ग्राहकांचा असतो कल-
कोरोना महामारीमुळे जागतिक बाजारात अस्थिरता असल्याचे चित्र आहे. अशा काळात सोन्याची गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित मानले जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सण आणि गुंतवणूक या उद्देशाने धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याकडे कल असतो.