नवी दिल्ली - विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून ९ हजार १९७ कोटी रुपये काढून घेतले आहेत. केवळ सात सत्रातच एवढा निधी काढून घेतल्याने भांडवली बाजाराला मोठा फटका बसला आहे.
ट्रस्ट म्हणून नोंदणी करण्यात आलेल्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर अधिभार कर लावण्याचा केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्ताव करण्यात आला आहे. त्यानंतर विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. जिओजीट फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख (संशोधन) विनोद नायर म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असल्याने गुंतवणूकदार चिंतित आहेत. तसेच युरोप आणि चीनची अर्थव्यवस्थेचा जीडीपी घसरत चालला आहे. अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्ध, ब्रेक्झिटचा तिढा आणि भू-राजकीय वादामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणखीन घसरण्याची भीती आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हे शेअरऐवजी सरकारी रोखे आणि सोन्यामध्ये गुंतवणुकीकडे वळत आहेत.
मॉर्निंगस्टारचे वरिष्ठ विश्लेषक व्यवस्थापक हिंमाशू श्रीवास्तव म्हणाले, मंदावलेल्या अर्थव्यवस्था व असमाधानकारक मान्सून यामुळे शेअर बाजारावर परिणाम होत आहे. जर सरकारने विदेशी गुंतवणूकदार संस्थांवरील अधिभार शुल्क लागू घेण्याचा निर्णय मागे घेतला तर परिस्थितीमध्ये बदल होवू शकतो.