नवी दिल्ली - एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येत असताना शेअर बाजाराचा निर्देशांक कमी-अधिक फरकाने वधारत आहे. असे असले तरी विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी (एफपीआय) मे महिन्यात भांडवली बाजाराला गुंतवणुकीसाठी पाठ फिरविली आहे. एफपीआयने सुमारे ४ हजार ३७५ कोटींची गुंतवणूक भांडवली बाजारातून काढून घेतली आहे.
निवडणूक निकालादिवशी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) चांगल्या निधीची गुंतवणूक केल्याचे फंड्स इंडियाचे विद्या बाला यांनी सांगितले. एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर २३ मेला एफपीआयने १ हजार ३५२. २० कोटींची गुंतवणूक केली आहे. एनडीए सरकार दुसऱ्यांदा सत्तेत येताना एफपीआय हे सावध पण आशावादी आहेत. बँकांसह पायाभूत क्षेत्रात एफपीआय गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखवित असल्याचे बाला यांनी सांगितले.
मोर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझरचे संशोधक व्यवस्थापक कौस्तुभ बेलापूरकर म्हणाले, केंद्रात स्थिर सरकार येणार आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून अधिक गुंतवणूक होईल, अशी आमची अपेक्षा आहे.
एप्रिलमध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १६ हजार ९३ कोटींची गुंतवणूक केली. मार्चमध्ये ४५ हजार ९८१ कोटींची तर फेब्रुवारीमध्ये ११ हजार १८२ कोटींची गुंतवणूक केली.
२ मे ते २४ मे दरम्यान विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ४ हजार ३७५.८६ कोटी भांडवली बाजारातून काढून घेतले आहेत.