नवी दिल्ली - जगभरात दहशत माजवलेल्या कोरोनाचा भारतीय शेअर बाजारावरही दुष्परिणाम दिसून येत आहे. मार्च महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 1 लाख 18 हजार 184 कोटी रुपये काढून घेतले आहेत. कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केल्यानंतर गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेण्यास सुरुवात केली.
आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात 61 हजार 973 कोटी रुपयांची इक्विटी आणि 56 हजार 211 कोटी रुपयांचे बाँड असे एकूण 1 लाख 18 हजार 184 कोटी रुपये बाजारातून काढून घेण्यात आले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारातून पैसा काढून घेतल्याची नोंद नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीमध्ये झाली आहे. तर एप्रिल महिन्यातील केवळ दोन सत्रांमध्ये एकूण 6735 कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. त्यामध्ये 3802 कोटी इक्विटी आणि 2933 कोटी कर्ज रक्कम काढली आहे.
मार्च महिन्यात मुख्यत्वे क्वाट फंड, हेच फंड आणि रिस्क पार्टी फंड यांनी त्यांच्याकडील शेअर्सची विक्री केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे तज्ज्ञ हर्ष जैन यांनी सांगितले. वेगाने वाढत जाणाऱ्या भारतीय बाजाराला covid-19 मोठा फटका बसला, या आजाराची तीव्रता आणि त्याचा लोकांवरील प्रभाव वाढत गेला तस-तसे येथील विदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेणे पसंत केले.
30 मार्चरोजी एफबीआय कॉर्पोरेट बाँडमध्ये 15 टक्के गुंतवणूक करता येईल, यासाठीची मर्यादा आरबीआयने वाढविली. हे उत्साहवर्धक पाऊल असले तरीही तत्काळ गुंतवणूक होण्याची शक्यता नाही. लॉकडाऊनचा कालावधी किती काळ राहील आणि सामान्य परिस्थिती पुन्हा निर्माण होत नाही तोपर्यंत आशादायक चित्र नसल्याचे जैन म्हणाले.