मुंबई - कॉर्पोरेटमधील वित्तीय कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने शेअर बाजार निर्देशांक २२० अंशाने वधारून बंद झाला. त्यामुळे शेअर बाजाराने आज पुन्हा एकदा ४०,००० हजार अंशाचा टप्पा ओलांडला आहे. कररचनेतून दिलासा मिळण्याची शक्यता असल्याने शेअर बाजारामधील गुंतवणूकदारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
शेअर बाजार निर्देशांक २२०.०३ अंशाने वधारून ४०,१७८.१२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ५७.२५ अंशाने वधारून ११,८४४.१० वर पोहोचला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एसबीआय,टीसीएस, आयटीसी,भारती एअरटेल,सन फार्मा, इन्फोसिस आणि बजाज ऑटोचे शेअर हे ३.३७ टक्क्यांनी वधारले आहेत. येस बँक, मारुती, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर २.४१ टक्क्यांनी घसरले आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार केंद्र सरकार एलटीसीजी करात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील गुंतवणूकदारांनी उत्साहाने शेअर खरेदी केली आहे. तसेच ब्ल्यूचिप कंपन्यांनी कॉर्पोरेट करात कपात केल्यानंतर दुसऱ्या तिमाहीत चांगली आर्थिक कामगिरी केली. अशा सकारात्मक स्थितीत शेअर बाजाराचा निर्देशांक वाढला आहे.