मुंबई - शेअर बाजार निर्देशांक हा २९२ अंशाने वधारून ३८,५०६ वर बंद झाला. तर निफ्टीचा निर्देशांक हा बाजार बंद होण्यापूर्वी ५० अंशाने वधारून ११,४२८ वर पोहोचला. अमेरिकेबरोबर करार करणार असल्याची चीनने पुष्टी दिली आहे. त्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
निफ्टीमध्ये आयटी कंपन्या व्यतिरिक्त सर्व कंपन्यांचे शेअर वधारले. निफ्टी ऑटोचे शेअर २.२ टक्क्यांनी वधारले. तर धातुचे शेअर १.५ टक्के व खासगी बँकांचे शेअर १.३ टक्क्यांनी वधारले.
शेअर बाजारात अदानी ट्रान्समिशनचे शेअर हे ५.८ टक्क्यांनी वधारले होते. हिरो मोटोकॉर्पचे शेअर २.६ टक्के, मारुती सुझुकीचे शेअर २.५ टक्के व महिंद्रा आणि महिंद्राचे शेअर २.४ टक्क्यांनी वधारले. भारती एअरटेल, भारती इन्फ्राटेल, इन्फोसिस, टाटा मोटर्स आणि जेएसडब्ल्यूचे शेअर घसरले.