कोलकाता - देशाची अर्थव्यवस्था 2024-25 पर्यंत 5 लाख कोटी डॉलरची होणे सहजशक्य असल्याचे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले. त्यासाठी खासगी क्षेत्राने पुढाकार घेण्याची त्यांनी गरज व्यक्त केली. ते इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक बैठकीत बोलत होते.
राजीव कुमार म्हणाले, केवळ सरकार हे 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही.
खासगी क्षेत्राबरोबर काम करण्यासाठी अनेक पावले सरकारने अर्थसंकल्पातून उचलली आहेत. यातून सरकारची इच्छाशक्ती दिसून आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना सहाय्य तसेच कॉर्पोरेट रोख्यांच्या बाजारपेठेसाठी दीर्घकाळासाठी नियोजन यांचा समावेश आहे.
पुढे राजीव कुमार म्हणाले, भारत हा एकाधिकारशाही नसलेला देश नव्हता. जे काही निर्णय घेण्यात येतील, ते लोकशाहीच्या आकृतीबंधात असतील असे त्यांनी स्पष्ट केले. कृषी क्षेत्रात रचनात्मक सुधारणा सुरू ठेवण्याची त्यांनी गरज व्यक्त केली. अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलर होण्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे. शेतीचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता असल्याचेही राजीव कुमार यावेळी म्हणाले.