नवी दिल्ली- महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब यासारख्या बिगर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रामधील भाजप सरकारवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेससह भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संकटकाळात जीएसटीचे पैसे थकित ठेवल्यामुळे केंद्र सरकारवर टीका केली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, की आम्ही भीक नाही तर थकित पैसे मागत आहोत. पश्चिम बंगालला केंद्र सरकारकडून ५३ हजार कोटी रुपये येणे आहे. केंद्र सरकारकडे निधी नाही. कर्मचाऱ्यांना वेतन देणे खूप कठीण आहे. खूप गंभीर स्थिती आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग संतप्त झाले. ते म्हणाले, की राज्याची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. सध्याच्या अंदाजानुसार पंजाबची चालू वर्षाखेर वित्तीय तूट २५ हजार कोटी रुपये होणार आहे. कोरोनाच्या समस्येवर मात करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. कधी कधी मी विचार करतो, मी वेतन आणि इतर भत्ते कसे देणार?यापूर्वीच आम्ही कोरोनावरील उपाययोजनासाठी ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत.
केंद्र सरकारने जीएसटीचा मोबदला दिला नाही. सर्व राज्यांनी बळकट होवून अधिकारासाठी केंद्र सरकारविरोधात लढावे, अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली. ते म्हणाले, की एप्रिलपासून राज्याला केंद्र सरकारकडून जीएसटी मोबदला मिळाला नाही. आम्ही अनेकदा केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. कधी प्रतिक्रिया मिळते, तर कधी प्रतिक्रिया मिळत नाही.
दरम्यान, जीएसटी कायदा लागू झाल्यापासून पाच वर्षे राज्यांना नुकसान भरपाई म्हणून केंद्र सरकारला दरवर्षी मोबदला द्यावा लागतो. दरम्यान, उद्या जीएसटीच्या समितीवर राज्यांना देण्यात येणाऱ्या जीएसटी मोबदलाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.