नवी दिल्ली - भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आर्थिक धोरणावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर घणाघाती टीका केली. निर्मला सीतारामन यांना अर्थशास्त्र माहीत नाही, अशा शब्दात स्वामी यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाची पाठराखण केली. तसेच देशात मंदी असल्याचे नाकारले होते. त्यावर बोलताना स्वामी यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांवर टीका केली होती. त्यावेळी ते म्हणाले, तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये पाहिले, तर दिसेल की त्या उत्तर देण्यासाठी सरकारी नोकरांकडे माईक देतात. सध्या देशात कोणती समस्या आहे? मागणी कमी आहे. पुरवठा हा प्रश्न नाही. परंतु, त्यांनी काय करावे? त्यांनी कॉर्पोरेट कर कमी केला आहे. कॉर्पोरेटकडे खूप पुरवठा आहे. ते फक्त त्याचा वापर करतात.
हेही वाचा - महाविकासआघाडीचा भाजपला शह; विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती लांबणीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार हे त्यांना सत्य सांगायला घाबरतात, असेही स्वामी यांनी मुलाखतीमध्ये सांगितले. पंतप्रधानांना विकास दर चांगला असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढे ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना मी नको आहे. कोणत्याही मंत्र्यांनी त्यांच्यापाठीमागे बोलू नये, असे पंतप्रधान मोदींना वाटते. सार्वजिक ठिकाणीच नव्हे तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलू नये, असे त्यांना वाटते. सध्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर हा 4.8 टक्क्यापर्यंत आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री सांगतात. मात्र, हा विकासदर 1.5 टक्के आहे, असा त्यांनी मुलाखतीत दावा केला.
हेही वाचा - समाजाची चिंताजनक स्थिती हे अर्थव्यवस्था ढासळण्याचे मूलभूत कारण - मनमोहन सिंग
तुम्ही अर्थव्यवस्थेचे डोळ्यांनी चांगले परीक्षण केले तर तुम्हाला विकासदर कमी झाल्याचे दिसेल, असे वक्तव्य सीतारामन यांनी राज्यसभेत केले होते. मंदी अद्याप आली नाही व येणारही नाही, असे त्यांनी सांगितले होते.
आर्थिक वर्ष 2015 मध्येच स्वामी यांनी अर्थव्यवस्थेबाबत इशारा देणारी अनेक ट्विट केली होती. स्वामी हे केंद्रीय अर्थमंत्रीपदासाठी आजवर इच्छुक राहिलेले आहेत. त्यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींवरही कठोर टीका केली होती.