मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पाप्रमाणेही भारतीय रिझर्व्ह बँकेने पुढील आर्थिक वर्षात विकासदाराबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात विकासदर हा १०.५ टक्के राहिल असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे. ते पतधोरण जाहीर करताना पत्रकार परिषदेत बोलत होते.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना जीडीपीसह महागाईबाबत भाष्य केले.
अर्थव्यस्थेबाबत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास काय म्हणाले ?
- येत्या काळात भाजीपाल्यांचे दर कमी राहणार आहेत.
- चालू तिमाहीत किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण हे ५.२ टक्क्यापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
- तर पुढील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण कमी होऊन ४.३ टक्के होईल.
- कोरोनाविरुद्धच्या लसीमुळे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
- मार्च अखेर महागाईच्या उद्दिष्टाचे सरकार पुनरावलोकन करणार असल्याचे आरबीआय गव्हर्नर दास यांनी सांगितले.
आरबीआयने पतधोरण जाहिर करताना रेपो दर हा 4 टक्के 'जैसे थे' ठेवला आहे. सलग चौथ्यांदा आरबीआयने रेपो दर 'जैसे थे' ठेवला आहे.
विकासदरात लक्षणीय सुधारणा झालेली आहे. केंद्रीय अर्थव्यवहार मंत्रालयाचे सचिव तरुण बजाज यांनी अर्थसंकल्प २०२१-२१ जाहीर केल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात जीडीपीचे प्रमाण हे १० ते १०.५ टक्के राहिल, असा अंदाज केला होता. महसुलाच्या उत्पन्नाचे आकडे हे जास्त सांगण्यात आलेले नाहीत, असेही बजाज यांनी स्पष्ट केले होते.