नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. यावेळी सध्याच्या आर्थिक स्थितीवर आणि द्विमासिक पतधोरणावर चर्चा करण्यात आली. आरबीआय ४ एप्रिलला पतधोरण जाहीर करणार आहे.
दर दोन महिन्यांनी आरबीआयची पतधोरण समितीची बैठक घेण्यात येते. ही बैठक २ ते ४ एप्रिलदरम्यान पार पडणार आहे. पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी आरबीआयचे गव्हर्नर हे केंद्रीय अर्थमंत्रींची भेट घेतात. त्या परंपरेप्रमाणे भेट घेण्यात आल्याचे गव्हर्नर शक्तिकात दास यांनी माध्यमांना सांगितले. ११ एप्रिलपासून लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे पतधोरणाची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
बँकांनीही कमी रेपोदराप्रमाणे व्याजदर करावे - आरबीआय गव्हर्नर
सलग अठरा महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये आरबीआयने रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली होती. किरकोळ क्षेत्रातील महागाई ही २.५७ टक्के वाढली आहे. असे असले तरी आरबीआयच्या उद्दिष्टावरून ही महागाईची टक्केवारी कमी आहे. आरबीआयने रेपो दर कमी केल्यांतर अनेक बँकांनी कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. तरीही काही बँकांनी व्याजदर कमी केले नसल्याने आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सरकारी आणि खासगी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.