मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने कोरोनाच्या संकटातही काम अखंडपणे सुरू राहण्यासाठी 'वॉर रूम' तयार केली आहे. या वॉर रूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी विशेष आभार मानले आहेत.
कोरोनाचा विळखा वाढत असताना वित्तीय स्थिरता आणि देशातील आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्याचे आरबीआय समोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी आरबीआयने उद्योग संसर्ग नियोजन (बिझनेस कंटिन्जेन्सी प्लॅन) केले आहे. यामध्ये आरबीआयचे काम एका अज्ञात ठिकाणी सुरू केलेल्या वॉर रूममधून आरबीआयचे काम 24X7 तास सुरू आहे. यामध्ये सुरुवातीला आरबीआयचे केवळ अत्यंत महत्त्वाचे 120 अधिकारी व कर्मचारी होते. त्यासोबत इतर 60 कर्मचारीही देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने टाळेबंदीत वाढ केल्यानंतर अधिकाऱ्यांची संख्या 120 वरून 150 करण्यात आली आहे.
हेही वाचा-येस बँक घोटाळा : वाधवान पिता-पुत्राच्या ईडी कोठडीत 27 मेपर्यंत वाढ
देशात 25 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच 18 मार्चला आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वॉर रूम तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मार्चच्या मध्यापासून आरबीआयच्या केंद्रीय कार्यालयात केवळ 10 टक्के कर्मचारी उपस्थित राहत आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत वॉर रूममधील 200 अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले. त्यासोबत 24X7 सेवा देणाऱ्या पुरवठादारांचेही दास यांनी आभार मानले.
हेही वाचा-धक्कादायक! 2.9 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती 'डार्क वेब'वर लीक
अशी आहे वॉर रुम-
वॉर रूममध्ये निम्मेच कर्मचारी कार्यरत राहतात. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना राखीव ठेवण्यात येते. वॉर रूममधील कर्मचाऱ्यांना पीपीई किटही देण्यात आलेली आहे. त्यांची सुरक्षा व आरोग्यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये दररोज अब्जावधी व्यवहार होतात. तर 31 प्रादेशिक कार्यालयांसह केंद्रीय कार्यालयामध्ये 14 हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
हेही वाचा-अनिल अंबानींना इंग्लंडच्या न्यायालयाचा दणका; 71.7 कोटी डॉलर बँकेला देण्याचे आदेश