मुंबई - कर्जदारांना चक्रवाढ व्याजमाफी द्यावी, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका व बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना दिले आहेत. ही व्याजमाफी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ५ नोव्हेंबरपर्यंत द्यावेत, असे आरबीआयने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
सर्व कर्ज देणाऱ्या संस्थांनी चक्रवाढ व्याजमाफीच्या योजनेसाठी योग्य ती वेळेवर कार्यवाही करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.
कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
चक्रवाढ व्याजमाफीत गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आदी कर्जांचा समावेश आहे. चक्रवाढ व्याजमाफीचा लाभ २ कोटीपर्यंतचे कर्ज घेणाऱ्यांनाच होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सरकारला निर्णय घेण्याचे दिले होते निर्देश
केंद्र सरकारने कर्जफेड मुदतवाढी कालावधीतील चक्रवाढ व्याज माफ करण्याचे २३ ऑक्टोबरला जाहीर केले आहेत. ही चक्रवाढ व्याजमाफी १ मार्च ते ३१ ऑगस्टपर्यंतच्या कर्जासाठी लागू आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑक्टोबरच्या सुनावणीत कर्जमाफीबाबत लवकर निर्णय घेण्याचे केंद्र सरकारला निर्देश दिले होते. सर्वसामान्यांची दिवाळी सरकारच्या हातात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.
दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात कर्जदारांना दिलासा देण्यासाठी आरबीआयने कर्ज फेडण्यासाठी १ मार्च ते ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.