नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेत सातत्याने घसरण होत असल्याने केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत अर्थव्यवस्था परत रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय अर्थसंकल्पात स्वत: लक्ष घालीत आहेत.
वर्ष २०१९-२० चा अर्थसंकल्प केवळ नॉर्थ ब्लॉकपुरते राहिलेला नाही. कारण पंतप्रधान मोदी स्वत: हे अर्थसंकल्पाच्या कामात सक्रिय भूमिका बजावत आहेत. गेल्या दोन दिवसात पंतप्रधान मोदी यांनी विविध उद्योगप्रमुखांच्या भेटी घेत त्यांच्या प्रतिक्रिया व सूचना जाणून घेतल्या आहेत. तर विविध उद्योगपतींच्या १० बैठका घेतल्या आहेत. मोदींनी उद्योगपतींच्या सूचना काळजीपूर्वक ऐकल्या आहेत. तसेच समस्यावर मात करण्यासाठी उपाययोजनाही जाणून घेतल्याचे सूत्राने सांगितले.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता
प्रत्येक मंत्रालयाने पाच वर्षांचे व्हिजन प्लॅन तयार करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या होत्या. या व्हिजन प्लॅनचा पंतप्रधानांनी आढावाही घेतला आहे. मोदींनी अर्थसंकल्पाबाबत सर्वसामान्यांकडून सूचना मागविल्या आहेत. सूत्राने म्हटले, येत्या तीन आठवड्यात अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर उपाय जाणून घेण्यासाठी जास्त वेळ दिला आहे. यात आश्चर्याची कोणतीही गोष्ट नसल्याचे सूत्राने म्हटले.
हेही वाचा-बीएमडब्ल्यूलाही मंदीची झळ; विक्रीत १३.८ टक्क्यांची घसरण