नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगातील बैठकीत अर्थतज्ज्ञ आणि तज्ज्ञांशी अर्थव्यवस्थेवर चर्चा करत आहेत. तसेच अंदाजित विकासदर ५ टक्के असलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायावरही मोदी चर्चा करत आहेत.
नीती आयोग ही केंद्र सरकारची 'थिंक टँक' आहे. या थिंक टँकच्या कार्यालयातील बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, इतर केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि इतर वरिष्ठ उपस्थित राहिले आहेत. या बैठकीला सकाळी सुरुवात झाली आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजारात ५०० अंशाची उसळी : मध्यपूर्वेतीत तणाव कमी होण्याच्या शक्यतेचा परिणाम
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देब्रॉय हेदेखील उपस्थित आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकासदर ५ टक्के राहणार आहे. हा गेल्या ११ वर्षातील सर्वात कमी विकासदर असण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दिग्गज उद्योगपतींशी चर्चा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता