नवी दिल्ली- नोटाबंदीच्या निर्णयाला आज (8 नोव्हेंबर) 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी होऊनही चलनातील नोटांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, चलनातील नोटांचे प्रमाण वाढण्याची गती कमी आहे. दुसरीकडे डिजीटल व्यवहारही वाढले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात लोकांनी रोकड जवळ ठेवणे अधिक पसंत केले. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात चलनातील नोटांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश आकडेवारीनुसार डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि युपीआय अशा माध्यमांतून डिजील व्यवहार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. एनपीसीआय ही डिजीटल व्यवहारासंबंधी नियमन करणारी सरकारी संस्था आहे. डिजीटल व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने एनपीसीआय अधिक वेगाने विकसित झाली आहे.
संबंधित बातमी वाचा-नोटा बंदीने जनतेवर भीक मागण्याची वेळ - संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 500 रुपये आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. त्यामागे डिजीटल चलनाला प्रोत्साहन देणे आणि काळ्या पैशांवर नियंत्रण आणणे हा हेतू होता.
- आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार 4 नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात 17.74 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. तर 29 ऑक्टोबर 2021 मध्ये चलनात 29.17 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या.
- आरबीआयच्या माहितीनुसार 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत चलनाती नोटांचे मूल्य हे 26.88 लाख कोटी रुपये होते. तर 29 ऑक्टोबर 2021 मध्ये चलनातील नोटांचे मूल्य वाढून 2,28,963 रुपये झाले. वर्षभराच्या तुलनेत 30 ऑक्टोबर 2020 मध्ये 4,57,059 कोटी रुपये आणि 1 नोव्हेंबर 2019 रोजी 2,84,451 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
- 2020-21 मध्ये चलनातील नोटांचे मूल्य हे 16.8 टक्के तर नोटांचे प्रमाण हे 7.2 टक्क्यांनी वाढले. तर 2019-20 मध्ये नोटांचे प्रमाण हे 14.7 टक्के तर नोटांचे प्रमाण हे 6.6 टक्क्यांनी वाढले. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये चलनातील बँक नोटांचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण महामारी राहिले आहे.
संबंधित बातमी वाचा-मोदीजी, आता तुम्हीच सांगा कोणत्या चौकात शिक्षा द्यायची - नवाब मलिक
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला अजूनही नोटा बदलण्याची प्रतिक्षा
केंद्र सरकारने नोव्हेंबर, 2016 मध्ये एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा भारतीय चलनातून बाद केल्या. यानंतर चलनी नोटा या मूल्यहीन झाल्या आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे जमा झालेल्या तब्बल तब्बल 576 कोटी रुपये मूल्य असलेल्या जुन्या नोटा सुरुवातीची सात महिने बॅंकेतच पडून होत्या. अनेक प्रयत्नांनंतर यापैकी 554 कोटी रुपयांच्या नोटा बदलून मिळाल्या. याच नोटांपैकी शिल्लक असलेल्या 22 कोटी 25 लाख रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही बॅंकेला बदलून मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे बॅंकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
संबंधित बातमी वाचा-पुणे जिल्हा बँकेस 22 कोटी 25 लाख रुपयांच्या जुन्या नोटा बदलून मिळण्याची प्रतीक्षा
पंतप्रधानांना कोणत्या चौकात शिक्षा द्यावी
नोटबंदीमुळे फायदा झाला नाही. तर देशातल्या जनतेने मला चौकात शिक्षा द्यावी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. मात्र, आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. नोटबंदीमुळे कोणताही फायदा झाला नाही. मग आता पंतप्रधानांना कोणत्या चौकात शिक्षा द्यावी, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना लगावला.