नवी दिल्ली - जुन्या १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा भविष्यात चलनातून बंद होणार नसल्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेने खुलासा केला आहे. या नोटा बंद होणार असल्याची चर्चा गेली काही दिवस समाज माध्यमांमध्ये होती.
भारतीय रिझर्व्ह बँक येत्या काळात १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करणार असल्याची माहिती आरबीआयचे महाप्रबंधक बी. महेश यांनी कर्नाटकमधील एका कार्यक्रमात दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून १०० रुपयांच्या महात्मा गांधी श्रेणीतील जुन्या नोटा आरबीआयने छापणे बंद केल्याचा दावाही बी. महेश यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर १०० रुपयांसह १०, ५ रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होती. हे वृत्त फेटाळून लावत आरबीआयने ट्विटने करत चुकीची माहिती असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा-महामारीतही भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्क्यांनी वाढ
केंद्र सरकारने २०१९ मध्ये १०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. तर ५ आणि १० रुपयांच्या नवीन नोटा २०१८ मध्ये चलनात आणल्या आहेत. त्याचवेळेस जुन्या नोटाही चलनात सुरू आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वी अचानक नोटाबंदीचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा-टीसीएसने रिलायन्सला टाकले मागे; ठरली सर्वाधिक भांडवली मुल्याची कंपपनी