नवी दिल्ली - अबकारी शुल्क आणि उपकर वाढल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. असे असले तरी रेल्वेच्या तिकिटांचे दर वाढविण्याचा प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्यसभेत सांगितले.
पेट्रोलियम उत्पादनाच्या वाढत्या किमतीने प्रवाशांवर आणि तिकिट दरावर काय परिणाम झाला, असा प्रश्न काँग्रेसचे नेते बी.के.हरिप्रसाद यांनी रेल्वेमंत्र्यांना प्रश्नोत्तराच्या तासात विचारला. यावर उत्तर देताना पियूष गोयल म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून रेल्वेकडून डिझेलचा वापर कमी होत आहे. रेल्वे मंत्रालय २०२२ पर्यंत १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल व डिझेलवर प्रति लिटर १ रुपया अबकारी शुल्क आणि उपकर वाढविण्याचा अर्थसंकल्पातून प्रस्ताव केला. डिझेलची वापर करणारी रेल्वे ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची ग्राहक संस्था आहे. मात्र कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याकरिता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी रेल्वेने हरित उर्जेचा वापर करण्यासाठी सुरुवात केली आहे.
विद्युतीकरणाबरोबरच रेल्वेमध्ये जैवइंधनाचाही वापर वाढविण्यात येत आहे.