नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या कृषी संस्था आणि कृषीतज्ज्ञांची मंगळवारी बैठक घेणार आहेत. या बैठकीत कृषी क्षेत्राची प्रगती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध मार्गांवर करण्यात येणार आहे.
कृषीशी निगडीत बहुतेक संस्थांनी केंद्रीय अर्थमंत्रालयापुढे यापूर्वीच मागण्या सादर केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी सीतारामन हे उद्योजक संस्थांशी चर्चा करणार आहे. यावेळी थेट विदेशातून होणारी गुंतवणूक (एफडीआय) आणि औद्योगिक उत्पादन अशा विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
देशाच्या पहिल्या पूर्णवेळ असलेल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी गेल्या महिन्यात पदभार घेतला आहे. त्या ५ जूलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्र सरकार मत्स्योत्पादन, कुक्कुटपालन आणि पशुसंवर्धन मंत्रालयावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. सरकारने स्वतंत्र मत्स्योत्पादन मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दर्जाच्या मंत्र्याची निवड करण्यात आली आहे. एनडीए सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. विविध खात्यांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये फारसा फरक केला जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मान्सूनला विलंब झाल्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.