नवी दिल्ली - राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) सहकारी बँकांसह प्रादेशिक ग्रामीण बँकांना २० हजार ५०० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. हा निधी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने फेरवित्तपुरवठा करण्यासाठी २५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्याचा भाग म्हणून नाबार्डने प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूटला फेरवित्तपुरवठा करण्यात आला आहे. सहकारी बँकांना १५ हजार २०० कोटी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना ५ हजार ३०० कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे नाबार्डने म्हटले आहे.
मान्सूनपूर्व आणि खरीप हंगाम २०२० सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना पुरेसा वित्तपुरवठा होण्यासाठी हा निधी देण्यात येत असल्याचेन नाबार्डने म्हटले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नाबार्डने सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना ५ हजार कोटी रुपये दिले होते. नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक जिजी मामीन म्हणाले, की यापूर्वीच आम्ही सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना २० हजार ५०० कोटी रुपयांचे वितरण केले आहे. येत्या दोन आठवड्यांत उर्वरित निधी देण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा-खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची वाढणार चिंता; गृह मंत्रालयाने 'तो' आदेश घेतला मागे
यापूर्वी आरबीआयने सिडबीसाठी १५ हजार कोटी रुपये आणि नॅशनल हाऊसिंग बँकेसाठी (एनएचबी) १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. गेल्या दोन महिन्यांत सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांनी सुमारे नवे १२ लाख किसान क्रेडिट कार्डचे वाटप केले आहे.
हेही वाचा-' आत्मनिर्भर' आर्थिक पॅकेजवर 'या' राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा नाराजीचा सूर