नवी दिल्ली - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या संकटात आणखी भर पडली आहे. प्रत्यक्ष कराचे संकलन चालू आर्थिक वर्षात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत घटले आहे. सूत्राच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात १५ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष कराचे संकलन गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६.१ टक्क्यांनी घसरले आहे.
प्रत्यक्ष कराचे संकलन घटले असताना वित्तीय व्यवस्थापन आणि वित्तीय तुटीची समस्या हाताळताना केंद्र सरकारची मोठी कसोटी लागणार आहे. तसेच आगामी अर्थसकंल्पात प्राप्तिकरात कपात करण्याचा निर्णय होण्याची शक्यताही धूसर झाली आहे. सूत्राच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारीदरम्यान ७.२६ लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कराचे संकलन झाले आहे. तर मागील आर्थिक वर्षात ७.७३ लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कराचे संकलन झाले आहे.
हेही वाचा-केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटविणार?
मंदावेल्या अर्थव्यवस्थेने चिंता वाढत असताना या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी अर्थव्यवस्थेला दीर्घकाळ लागणार आहे.
कॉर्पोरेट करातील कपातीचा फटका!
महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये कॉर्पोरेट करातील कपातीचा निर्णय घेतल्याने प्रत्यक्ष कराचे संकलन घटले आहे. प्रत्यक्ष भेट न देता प्राप्तिकर वसुलीसाठी (फेसलेस टॅक्स असेसमेंट) करण्यात येणारे प्रयत्न व मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळेही प्रत्यक्ष कराचे संकलन घटल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर हा ३५ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय सप्टेंबर २०१९ मध्ये जाहीर केला. प्रत्यक्ष कर संकलनामध्ये कॉर्पोरेट कराचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे कॉर्पोरेट करातील सवलतीनंतर चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत प्रत्यक्ष कराच्या संकलनात मोठी घट झाली आहे.
हेही वाचा-५जीच्या दहापट ६जीचे वेगवान इंटरनेट; 'या' देशात सुरू करण्याचे प्रयत्न