मुंबई - पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करणाऱ्या मेहुल चोक्सीचे आणखी एक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. चोक्सीने पंजाब आणि सिंध बँकेची ४४.१ कोटींची फसवणूक केली आहे.
मेहुल चोक्सी हा वेस्ट इंडिजमधी अँटिगा आणि बार्बाडोसचा रहिवासी नागरिक झाला आहे. पीएसबीने चोक्सीला कर्जबुडवा असे जाहीर केले आहे. पीएसबीच्या माहितीनुसार चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्स लि. आणि गीतांजली एक्सपोर्ट लि. या कंपनीने बँकेकडून कर्ज घेतले होते. कंपनीचे कर्ज फेडण्याची चोक्सी याने बँकेला हमी दिली होती. कर्ज थकविल्यानंतर बँकेने ते कर्ज ३१ मार्च २०१८ ला बुडित कर्ज (एनपीए) म्हणून जाहीर केले. त्यानंतर चोक्सी आणि त्याचे कुटुंब हे विदेशात पळून गेले आहेत.
बँकेने चोक्सीकडून थकित कर्जाच्या रकमेसह व्याजाची मागणी केली आहे. त्याने कर्ज थकविल्यानंतर बँकेने २७ सप्टेंबर २०१९ ला कर्जबुडवा म्हणून जाहीर केले आहे. चोक्सीशिवाय बँकने इतर २७ जणांना कर्जबुडवा म्हणून जाहीर केले.
सरकारी बँका सातत्याने तोट्यात जात आहेत. चोक्सी-मोदीसह त्यांच्या कंपन्यांनी अनेक बँकांची फसवणूक केली आहे. सर्व सरकारी बँकां त्यांच्याकडून थकित रक्कम वसूल करण्यासाठी एकत्रितपणे कायदेशीर कारवाई का करत नाहीत, असा सवाल अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी उपस्थित केला. स्थावर क्षेत्र, जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्रातील सर्व कंपन्यांच्या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडीट करावी, अशीही त्यांनी मागणी केली.