नवी दिल्ली - कोरोनाने केवळ लोकांच्या आरोग्यावरच नव्हे तर उद्योगांवरही परिणाम होत आहे. देशाच्या विविध भागांमधून आलेल्या माहितीनुसार 'covid-१९' मुळे वाहन उद्योग, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांचे नुकसान झालेले आहे.
एशियन डेव्हलपमेंट्स बँकेच्या (एडीबी) आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचे सुमारे २ हजार ७०० कोटी ते २ लाख १० हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. कोरोनाचा चीनसह इतर देशांत प्रसार होत असल्याने कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीत आणि मागणीवर परिणाम होत आहे.
हेही वाचा-'कोरोना'ने शेअर बाजार गुंतवणूकदारांच्या डोळ्यांत पाणी; गमाविले आठ लाख कोटी
'कोविड-१९' विविध क्षेत्रांवर झालेला परिणाम
- वाहन उद्योग
भारत वाहन उद्योगांसाठी लागणारे सुमारे २५ टक्के सुट्टे भाग चीनमधून आयात करतो. भारतीय वाहन उद्योगाच्या उत्पादनात ८ ते १० टक्के कपात होण्याची शक्यता आहे.
- औषधी उद्योग
भारतीय कंपन्या औषधांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे क्रियाशील औषधी घटकांची चीनमधून आयात करतात. भारतामध्ये महत्त्वाच्या औषधांची कमतरता भेडसावू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
- कृषी उत्पादने
व्यापारावर निर्बंध घालण्यात आल्याने भारतीय कापूस, मिरची आणि मसाले यांची चीनमध्ये होणारी निर्यात ठप्प झाली आहे.
- पशुसंवर्धन
म्हशीच्या मांसाच्या निर्यातीत फेब्रुवारीमध्ये ५० टक्के घट झाली आहे. तसेच व्हिएतनाम, मध्य पूर्व आणि युरोपियन बाजारपेठेतील मागणीही घटली आहे. कुक्कुटपालन उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आला आहे. त्यामुळे उद्योगाने सरकारकडे अनुदानाची मागणी केली आहे.
- पर्यटन-
कोविड-१९ चा सर्वात वाईट परिणाम पर्यटनावर झाल्याचे दिसत आहे. ताजमहालसारख्या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. शबरीमालाला येणाऱ्या भाविकांनी दर्शनाला येण्याचे नियोजन पुढे ढकलावे, अशी देवस्थानने विनंती केली आहे.
- मनोरंजन उद्योग
अत्यंत कमी काळातच मनोरंजन उद्योगाचे सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतीय सिनेमांचे चीनमधील होणारे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
हेही वाचा-'महामारीचा' दलाल स्ट्रीटने घेतला धसका; शेअर बाजारात २४०० अंशांनी घसरण
असे असले तरी कोविड -१९ चे देशाच्या अर्थव्यस्थेला काही चांगले फायदे होणार आहेत. उदा. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती सुमारे ३० टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यामुळे भारताच्या खनिज तेलाच्या आयातीचे बिल कमी होणार आहे. जर खनिज तेलाच्या बॅरलची किंमत ४५ डॉलर राहिली तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये खनिज तेलाचे अनुदान थेट ४० हजार कोटी रुपयांवरून १० हजार कोटी रुपये लागणार आहे.