नवी दिल्ली - थेट विदेशी गुंतवणूकीच्या नियम शिथिल करण्याबाबत आंतरमंत्रिय गटात चर्चा करण्यात आली. आंतरमंत्रिय गटाच्या अध्यक्षपदी औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यवहार (डीपीआयटी) गुरुप्रसाद मोहपात्रा हे होते. विदेशी गुंतवणूकदार विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित व्हावेत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.
ज्या क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणूकीला परवानगी अशा क्षेत्रासाठी नियम शिथील करण्यावर डीपीआयटी विचार करत आहे. बहुतांश क्षेत्रात विदेशी गुंतवणूक ही स्वयंचलित मार्गाने (ऑटोमॅटिक रुट) करण्यात येते. मात्र, संरक्षण, दूरसंचार, माध्यम, औषधी आणि विमा अशा क्षेत्रासाठी सरकारची परवानगी लागते. तर दूरसंचार, विमा, बँकिंग आणि माध्यमामधील थेट विदेशी गुंतवणूकीसाठी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. ज्या क्षेत्रांना सरकारची परवानगी लागते, अशा क्षेत्रांसाठीही नियम शिथील करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-आरबीआयचा राज्यातील 'या' दोन सहकारी बँकांना दणका; सव्वा कोटींचा दंड
काय आहे देशीतील थेट विदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) स्थिती
सररकारी मार्गाने थेट विदेशी गुंतवणूक करताना संबंधित मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. तर स्वयंचलित मार्गाने गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना त्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेला द्यावी लागते. लॉटरी विक्री, जुगार, सट्टा, चिट फंड्स, निधी कंपनी, स्थावर मालमत्ता व्यवसाय आणि सिगरेटची निर्मिती अशा एकूण ९ उद्योगात थेट विदेशी गुंतवणूक करण्यावर निर्बंध आहेत. केंद्र सरकारने नुकतेच एकच ब्रँड असलेले रिटेल ट्रेडिंग, कंत्राटी उत्पादने आणि कोळसा उत्खनन या क्षेत्रातील निर्बंध शिथिल केले आहेत.
हेही वाचा- आरबीआयचा बंधन बँकेला १ कोटींचा दंड
सध्या, थेट विदेशी गुंतवणुकीला डीपीआयटी विभागाकडून ८ ते १० आठवड्यात परवानगी देण्यात येत आहे. चालू वर्षात एप्रिल-जूनच्या तिमाहीत थेट विदेशी गुंतवणूक ही २८ टक्क्यांनी वाढून १६.३३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.