नवी दिल्ली - कोरोना महामारीचा फटका बसलेले औद्योगिक क्षेत्र सावरत आहे. देशातील औद्योगिक उत्पादनात डिसेंबर २०२० मध्ये डिसेंबर २०१९ च्या तुलनेत १ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही माहिती औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) आकडेवारीतून समोर आली आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार उत्पादन क्षेत्राचे उत्पादन डिसेंबर २०२० मध्ये १.६ टक्क्यांनी वाढले आहे. खाणींच्या उत्पादनात डिसेंबर २०२० मध्ये ४.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर वीजनिर्मितीचे प्रमाण डिसेंबर २०२० मध्ये ५.१ टक्क्यांनी वाढले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ०.४ टक्क्यांची वाढ झाली होती.
हेही वाचा-अर्थसंकल्पावर विरोधकांकडून चुकीचे कथन - केंद्रीय अर्थमंत्र्यांची राज्यसभेत टीका
कोरोना महामारीत मार्चमध्ये देशभरात टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे मार्चपासून देशातील औद्योगिक उत्पादन निर्देशांकात १८.७ टक्क्यांची घसरण झाली होती. उत्पादन क्षेत्राचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकात एकूण ७७ टक्के वाटा असतो.
हेही वाचा-जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीकडून २० टक्के कर्मचारी कपातीची घोषणा
काय आहे औद्योगिक उत्पादन निर्देशांक -
देशातील अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक वृद्धीदर किती आहे, याची माहिती औद्योगिक उत्पादन निर्देशांकामधून समजू शकते. हे आकडेवारी काढण्यासाठी वेगवेगळ्या १५ संस्थांकडून आकडेवारी गोळा केली जाते.