नवी दिल्ली - कोरोना महामारीतील अर्थव्यवस्थेच्या घसरणीची आकडेवारी आज जाहीर झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल उत्पादनात (जीडीपी) २३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. ही गेल्या ४० वर्षातील सर्वात मोठी विकासदरातील घसरण आहे.
कोरोना महामारीपूर्वी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जानेवारी ते मार्च तिमाहीत विकासदर हा ३.१ टक्के होता. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये विकासदर हा त्यामागील ११ वर्षात सर्वात कमी ४.२ टक्के राहिला होता. कोरोना महामारीमुळे देशात २५ मार्च २०२० ला टाळेबंदी लागू केल्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.
विविध बँका आणि संस्थांच्या मत देशाचा जीडीपी हा चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत किमान १५ ते २० टक्के घसरण्याचा अंदाज होता. अर्थव्यवस्थेच्या विकासदरात २३. ९ टक्के घसरण झाली ही ही १९७९ नंतरची विकासदरामधील सर्वाधिक मोठी घसरण आहे. तेव्हा देशाचा विकासदर १९७९ मध्ये उणे ५.२ टक्के झाला होता.
देशाचा औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकात (आयआयपी) जूनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १६.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मे महिन्यात ३३.८ टक्के तर एप्रिलमध्ये ५७.६ टक्क्यांची औद्योगिक उत्पादन निर्देशांकात घसरण झाली आहे.