नवी दिल्ली - मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमीच्या (सीएमआयई) सेंटर फॉर मॉनिटरिंगने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलै २०२० मध्ये भारतात तब्बल पाच दशलक्ष लोकांनी नोकर्या गमावल्या आहेत. 'जुलैमध्ये 5 दशलक्ष लोकांनी आपले रोजगार गमावले. यापैकी टाळेबंदी सुरू झाल्यापासून निव्वळ पगारादार कर्मचाऱ्यांची स्थिती अधिक बिकट बनली आहे. एप्रिलमध्ये 17.7 दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. मात्र, जुलैपर्यंत हे प्रमाण 18.9 दशलक्षांवर पोहोचले,' असे सीएमआयईच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.
'नोकरदार वर्गातील रोजगारांची वाढती संख्या हे चिंतेचे कारण आहे. नियमित पगाराच्या नोकऱ्या मिळविणे खूप कठीण झाले आहे आणि या प्रकारच्या नोकर्या बऱ्यापैकी सुरक्षित असून त्या सहजपणे निघून जात नाहीत', असे यात म्हटले आहे. 2019-20 च्या तुलनेत नियमित पगारी नोकऱ्यांची संख्या सुमारे 19 दशलक्षने कमी झाली. या नोकऱ्या गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २२ टक्क्यांनी कमी झाल्याचे या अहवालात समोर आले आहे.
नियमित पगारादार वर्गानंतर, रोजंदारी कामगार, फेरीवाले, लहान व्यापारी यांना एप्रिल महिन्यात कोरोना महामारीच्या स्थितीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला. या सुमारास देशातील सर्व आर्थिक हालचाली थांबल्याची स्थिती निर्माण झाली. लॉकडाऊनच्या महिन्यांत 121.5 दशलक्ष रोजगार बंद झाले. यापैकी 91.2 दशलक्ष रोजगार याच वर्गांतील होते. एकूण रोजगारापैकी या प्रकारच्या रोजगाराचा वाटा सुमारे 32 टक्के होता. परंतु, एप्रिलमध्ये यातील तब्बल 75 टक्के रोजगार बंद झाला.
सीएमआयईने सांगितले की, 'वरील वर्गामधील नोकऱ्या गमावण्याचे प्रमाण इतके मोठे होते. कारण, त्यांचा रोजगार जवळजवळ संपूर्णपणे अनौपचारिक होता. अशा प्रकारचे रोजगार किंवा रोजगाराची ही अनौपचारिक श्रेणी त्यांच्या आसपासची अर्थव्यवस्था कार्यरत असताना विकसित होते. जेव्हा ही आजूबाजूची अर्थव्यवस्था संपुष्टात येते, तेव्हा या क्षेत्रातील रोजगार कमी होतो. त्याचप्रमाणे जेव्हा अर्थव्यवस्था गतिमान होते, तेव्हा या अनौपचारिक श्रेणीतील रोजगार पुन्हा तितक्याच वेगाने सुरू होतो. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू या प्रकारचा रोजगार पूर्वपदावर येऊ लागला आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
तथापि, टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्था सुरू झाल्यानंतर जूनपासून नोकर्या आणि रोजगाराच्या संधीही परत येऊ लागल्या आहेत. मात्र, परत आलेल्या नोकर्या किंवा रोजगार हे बहुतेक अनौपचारिक श्रेणीतील होते. सीएमआयईने म्हटल्यानुसार, एप्रिलमध्ये गमावलेल्या 91.2 दशलक्ष रोजगारांपैकी 14.4 दशलक्ष रोजगार मे महिन्यात परत आले. तर, 44.5 दशलक्ष रोजगार जूनमध्ये आणि 25.5 दशलक्ष रोजगार जुलै महिन्यात परत आले. या क्षेत्रातून आधीच्या तुलनेत विचार केला असता आता केवळ 6.8 दशलक्ष रोजगार परत येणे बाकी आहे. आकडेवारीनुसार, भारतातील सर्व रोजगारापैकी केवळ 21 टक्के रोजगार नियमित पगारी रोजगाराच्या स्वरुपात आहे. रोजगाराची ही श्रेणी आर्थिक धक्क्यांच्या काळात सर्वाधिक टिकाऊ आणि लवचिक आहे. म्हणूनच, यंदा एप्रिलमध्ये या प्रकारातील नोकऱ्यांची केवळ 15 टक्क्यांनी हानी झाली.