वॉशिंग्टन - अर्थव्यवस्थेचा विकासदर गेल्या सहा वर्षात सर्वात कमी आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारत सरकारला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. भारत सरकारने रचनात्मक सुधारणा, बँकांच्या कारभारातील स्वच्छतेतसह कामगार सुधारणा करावी, असे गीता यांनी म्हटले आहे.
गोपीनाथ या आठवड्यात भारतात येणार आहेत. त्या म्हणाल्या, भारतीय अर्थव्यवस्थेसमोर चक्रीय स्थिती आणि रचनात्मक आव्हाने आहेत. देशातील मंदावलेल्या व्यवस्थेचे व्यवस्थापन करणाऱ्या धोरणावर लक्ष केंद्रित करावे, अशी आमची शिफारस आहे. उत्पादनाच्या वृद्धी दराला चालना आणि मध्यम मुदतीच्या रोजगार निर्मितीवरही सरकारने लक्ष केंद्रित करावे, असे गोपीनाथ म्हणाल्या.
हेही वाचा-केंद्र सरकारकडून राज्यांना ३५ हजार कोटींचा जीएसटी मोबदला वितरित
केंद्र सरकारने वित्तीय शिस्तीच्या मार्गालाही धोरणात प्राधान्याने स्थान द्यायला पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये हे दिसत नाही. अधिक असलेले कर्ज कमी करण्याची गरज आहे. देशाने ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे ठेवलेले मध्यम मुदतीचे उद्दिष्ट हे योग्य आहे. त्यामध्ये गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे.
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे पर्यवेक्षण आणि नियमन अधिक कार्यक्षमतेने करावे, असेही त्यांनी भारत सरकारला सूचवले. विस्तारित अशा सर्वसमावेशक वृद्धीसाठी आरोग्य आणि शिक्षणातील सुधारणा अत्यंत महत्त्वाची आहे. भारताच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा अवधी आणखी वाढला आहे. त्याचे अनेकांसह आम्हाला, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला आश्चर्य वाटल्याचे गोपीनाथ यांनी सांगितले.