नवी दिल्ली - सोन्यावरील आयात शुल्क वाढविल्याने देशातील सोने व्यापारी व संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या निर्णयाबाबत महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सोन्यावरील आयात शुल्क वाढविणे हा केंद्र सरकारच्या धोरणाचा भाग आहे. या धोरणानुसार अनावश्यक वस्तुंवरील आयात नियंत्रण आणणे, हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोने तस्करीचा प्रश्न अंमलबजावणी संस्था सोडवतील, असे त्यांनी म्हटले.
सोन्यावरील आयात शुल्क वाढविल्याने तस्करीचे प्रमाण वाढेल, असे सोने व्यापाऱ्यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना अजय भूषण पांडे म्हणाले, आर्थिक निर्णय हे संपूर्णपणे आर्थिक वस्तुस्थितीवरूनच घेण्यात आले आहेत. कुणी त्याचा दुरुपयोग करावा, या हेतूने निर्णय घेण्यात आला नाही. अनावश्यक वस्तुंच्या आयातीत विदेशी चलन विनिमयाचा वापर केला जात नाही. त्यामुळे सोने कमी आयात करणे चांगले आहे. त्याबाबत देशाला चिंता आहे.
उद्योगाने अशी दिली आहे प्रतिक्रिया-
सोने आयात शुल्क वाढविल्याने जेम्स आणि ज्वेलरी उद्योगाने अर्थसंकल्पाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयात शुल्क वाढल्याने उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल, असे संघटनेने म्हटले आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे चेअरमन एन. अनंता पद्मनाभन यांनी सोन्याच्या किंमती 15.5 टक्क्यांनी वाढतील, असे म्हटले आहे. सोने आणि इतर मौल्यवान धातुवरील आयात शुल्कात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चीन व व्हिएतनामसारख्या शेजारील देशात उद्योग हलवावा लागेल, असे जेम्स अँड ज्वेलरी निर्यात परिषदेने म्हटले आहे.
एकाच वर्षात 982 टन सोन्याची आयात!
गेल्या वर्षी भारताने 982 टन सोन्याची आयात केली आहे. भारत हा सोने आयात करणारा जगातील आघाडीचा देश आहे. वित्तीय तूट वाढत असताना सोन्याची आयात वाढल्याने अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.