मुंबई - बँकांच्या सकल अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण सप्टेंबरमध्ये कमी झाल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. बँकांची सकल अनुत्पादक मालमत्ता सप्टेंबरमध्ये एकूण ९.१ टक्के राहिली आहे. तर गतवर्षी सप्टेंबरमध्ये सकल बुडीत मालमत्तेचे प्रमाण ११.२ टक्के होते.
वाणिज्य व्यापारी बँकांच्या अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) गतवर्षीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ३.७ टक्क्यांनी कमी झाले आहे. गेली सात वर्षे सकल अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण वाढले होते. मात्र, आर्थिक वर्ष २०१९ मध्ये अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण कमी झाले आहे. ही माहिती आरबीआयच्या 'ट्रेण्ड आणि प्रोग्रेस ऑफ बँकिंग २०१८-१९' मध्ये देण्यात आली आहे.
हेही वाचा-११० कोटींची फसवणूक; मारुतीच्या माजी एमडीविरोधात सीबीआयकडून गुन्हा
सकल अनुत्पादक मालमत्ता आणि निव्वळ अनुत्पादक मालमत्तेचा विचार करता सरकारी बँकांकडील मालमत्तेत गुणात्मक सुधारणा झाली आहे. थकित असलेल्या सकल अनुत्पादक मालमत्तेत घट झाली आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या अनुत्पादक मालमत्तेचे (जीएनपीए) गुणोत्तर प्रमाण कमी होण्यास मदत झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-गो एअरची देशातील १८ विमान उड्डाणे रद्द; प्रवाशांना मन:स्ताप
काय आहे एनपीए ?
कर्जदाराकडून जेव्हा कर्जावरील व्याज, मुद्दल किंवा दोन्हीही बँकेला देण्यात असमर्थता दाखविले जाते, तेव्हा ती मालमत्ता ही अनुत्पादक मालमत्ता (NPA) म्हणून जाहीर केली जाते.