नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती सुधारल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांपासून असलेल्या अनुत्पादक मालमत्तेमुळे बँकांवर परिणाम झाला होता. सार्वजनिक १३ बँकांनी सहामाही दरम्यान नफा नोंदविल्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सरकारी बँकांच्या प्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सरकारने घेतलेल्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्था पूर्ववत झाल्याचे सीतारामन यांनी सांगितले. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार सकल अनुत्पादक मालमत्ता (ग्रॉस एनपीए) हे मार्च २०१८ मध्ये ८.९६ लाख कोटी रुपये होते. तर सकल अनुत्पादक मालमत्ता ही कमी होऊन सप्टेंबर २०१९ मध्ये ७.२७ लाख कोटी रुपये एवढी झाली आहे.
हेही वाचा - १.१३ लाख कोटी रुपयांचे बँकांमध्ये घोटाळे; सहा महिन्यातच उच्चांक
एस्सार स्टील प्रकरणात ३८ हजार ८९६ कोटी रुपयांची वसुली केली आहे. तर गेल्या साडेचार वर्षात ४.५३ लाख कोटी रुपयांची वसुली केली आहे. मागील तीन आर्थिक वर्षात सरकारी बँकांनी २.३ लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, केंद्रीय दक्षता विभाग आणि कॅग या तीन 'सी'पासून बँकांना वाटणारी भीती कमी केल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
हेही वाचा - गुंतवणुकीसह उपभोक्तता वाढविण्याचे सर्वात मोठे आव्हान - शक्तिकांत दास