नवी दिल्ली - केंद्र सरकार लोकांना रोख रक्कमेची मदत देत नाही. यातून सरकार देशाची अर्थव्यवस्था सक्रियपणे उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. मोदींचे राज्य हे 'राक्षस 2.0' असल्याचीही त्यांनी टीका केली.
केंद्र सरकारने गरिबांना मदत करावी, अशी मागणी करत राहुल गांधींनी ट्विट केले आहे.
कोरोनाचा एमएसएमई क्षेत्रावर आणि अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाचा अहवाल राहुल गांधींनी ट्विटमध्ये शेअर केला आहे.
गरिबांसाठी तातडीने 10 हजार रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तसेच एमएसएमई उद्योगांसाठी आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेज द्यावे, अशीही गांधींनी मागणी केली.
एमएसएमई क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात येतो. या क्षेत्राला आर्थिक पॅकेज दिल्याने लोकांच्या हातात पैसा येईल. त्यामधून मागणी वाढण्यास मदत होईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने टाळेबंदी लागू केली. पण, ते ध्येय आणि हेतू पूर्ण करण्यात टाळेबंदी अपयशी ठरल्याची टीकाही काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी केली आहे.