हैदराबाद - टाळेबंदी आणि कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारला महसुली उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने खर्च आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोणत्याही नव्या योजनांची घोषणा करू नका, अशा सूचना वित्त मंत्रालयाने सर्व विभागांच्यामंत्रालयाला दिल्या आहेत.
कोणत्याही नव्या योजना अथवा योजनेंतर्गत दुसऱ्या योजना जाहीर करू नये, असे वित्त मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे. या सूचना आत्मनिर्भर पॅकेज आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजना अशा विशेष योजनांसाठी लागू नाहीत.
नव्या योजनांना चालू आर्थिक वर्षात तत्त्वतः मान्यता देण्यात येणार नाही. यापूर्वी सुरू झालेल्या नव्या योजना एका वर्षापर्यंत म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत स्थगित ठेवण्यात येणार असल्याचे वित्त मंत्रालयाने आदेशात नमूद केले आहे.
गेली तीन महिने अर्थव्यवस्था ठप्प राहिल्याने केंद्र सरकारचे जीएसटी आणि इतर करांपासून मिळणारे उत्पन्न घटले आहे. दुसरीकडे कोरोनाच्या संकटामुळे जाहीर केलेले आर्थिक पॅकेज आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी सरकारला मोठा खर्च करावा लागत आहे.