नवी दिल्ली - अर्थव्यवस्था घसरत असताना देशाला विदेशी चलन मिळवून देणाऱ्या निर्यातीतही घसरण झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये निर्यातीत ६.०५ टक्के घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये २६.१३ अब्ज डॉलर मुल्याची निर्यात झाली आहे.
निर्यातीबरोबर देशाच्या आयातीतही १३.४५ टक्के घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये लोहखनिज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मसाले आणि सागरी उत्पादनांची सकारात्मक निर्यात झाली आहे. तर दागिने आणि मौल्यवान रत्ने, अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात कमी झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.
हेही वाचा-आरबीआयकडून ४ ऑक्टोबरच्या पतधोरण निर्णयात पुन्हा व्याजदर कपात होणार : तज्ज्ञांचा अंदाज
कच्च्या तेलाची आयात ९.८ टक्क्यांनी घसरून १०.८८ अब्ज डॉलर झाली आहे. तर बिगर तेल उत्पादनांची आयात १५ टक्क्यांनी घसरून २८.७१ अब्ज डॉलर झाली आहे. देशाची एकूण निर्यात एप्रिल-ऑगस्ट २०१९ दरम्यान १.५३ टक्क्यांनी घसरून १३३.५४ अब्ज डॉलर झाली आहे. तर आयातदेखील ५.६८ टक्क्यांनी घसरून २०६.३९ अब्ज डॉलर झाली आहे.
हेही वाचा-...म्हणून केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध
सोन्याच्या आयातीलाही फटका बसला आहे. सोन्याची आयात ६२.४९ टक्क्यांनी घसरून १.३६ अब्ज डॉलर एवढी झाली आहे.